सुनिता विल्यम्स यांना अवकाश प्रवासात मिळालेले जीवन ज्ञान
सुनिता विल्यम्स यांना अवकाश प्रवासात मिळालेले जीवन ज्ञान
'अवकाशातून मानवी हेवेदावे क्षुद्र वाटतात.
अंतराळ प्रवासाने माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. जेव्हा तुम्ही अवकाशातून पृथ्वीकडे 'एक ग्रह' म्हणून पाहता, तेव्हा मानवी हेवेदावे किंवा मतभेद किती क्षुद्र आहेत, याची जाणीव होते,' अशी भावना अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी बुधवारी व्यक्त केली. 'जेव्हा तुम्ही अंतराळात पोहोचता, तेव्हा प्रत्येकजण हेच करतो, आपण सगळे आपले घर शोधू लागतो. माझे वडील भारतातील आहेत, तर माझी आई स्लोव्हेनियाची आहे. त्यामुळे साहजिकच मी ही दोन्ही ठिकाणे शोधत असते, ज्यांना मी घर म्हणू शकते आणि हेच तुमचे पहिले उद्दिष्ट असते,' असे त्या म्हणाल्या. मात्र पुढे 'ही सुरुवातीची 'आपले घर शोधण्याची भावना' हळूहळू पृथ्वीच्या एकतेच्या जाणिवेत बदलते,' असेही त्यांनी अधोरेखित केले.
'खरे सांगायचे तर मला असे वाटले की कुठल्याही गोष्टीवर कोणी भांडावेच का? मी लग्न केलेले आहे. मला नवरा आहे. आमच्यात भांडणे होतात. त्यामुळे वाद कसे असतात, हे मला समजते; परंतु प्रत्यक्षात असे का, हा विचार मनात येतो आणि त्या दृष्टिकोनातून पृथ्वीकडे पाहिल्यावर सगळेच क्षुद्र वाटते,' असे विल्यम्स म्हणाल्या.
सुनिता विल्यम्स यांची ही एक अत्यंत मूल्यवान आणि अनोखी मुलाखत. याचे शीर्षकही खूप समर्पक आहे. त्यांनी ज्या प्रकारच्या भावना यात व्यक्त केल्या आहेत त्या एका अंतराळवीरेच्या अनुभवातून आल्या असल्या कारणाने खूप महत्त्वाच्या आहेत. अशा प्रकारच्या विचारांचा अंगीकार करणे आपल्या सर्वांच्याच हिताचे ठरणार आहे.
त्यासाठी अंतराळात जाणे मुळीच गरजेचे व शक्य नाही. सर्व व्यापी परमेश्वराचे ध्यान करत असताना अंतराळात न जाता देखील आपल्या जागेवर बसून आपण कल्पनेच्या साह्याने अशा प्रकारचे दर्शन दररोज करू शकतो. त्यातून देखील हे विचार आपल्या मन व बुद्धि मध्ये दृढ होऊ शकतात. पण आपण रोज ते केलं पाहिजे. तसे करणाऱ्यांची संख्या जसजशी वाढेल तसे पृथ्वीवरील वातावरण अधिकाधिक शांततापूर्ण होत जाईल.
अशा ध्यानाची पद्धत - शांतपणे, स्वस्थपणे कोणत्याही आसनात बसायचं. त्यानंतर डोळे मिटून दिर्घ श्वास घ्यायचा. सर्वव्यापी परमेश्वर म्हणजे संपूर्ण विश्वाचा विचार मनात आणायचा. ते करत असताना आपल्याला ग्रह तारे दिसू लागतात आणि आपण अंतराळातून सूर्य आणि पृथ्वी यांचे ठिपके बघू लागतो. जेव्हा आपले मन या विश्वाशी एकरूप होते तेव्हा आपण असे सुनीता विल्यम्स यांच्यासारख्या विचार कळत नकळत करू लागतो. आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी अशाच प्रकारच्या ध्यानातून ' हे विश्वचि माझे घर ' असल्याचा विचार केला व तो सर्व जगाला प्रदान केला. तो आज अत्यंत छोटा झाला असला; तरीसुद्धा पुन्हा एकदा उसळी मारून वर येऊ शकतो. तसे करणे आपल्या सर्वांच्या हातात आहे आणि हिताचे आहे. बघुयात का करून?
आपला; डॉक्टर प्रसाद फाटक. पुणे.
Comments