कोकण

ते लवचिक कंबरेचे माड. त्यांची स्वरूप सुंदरीनाही लाजवणारी नजाकत. ऐसपैस पानाच्या बहुप्रसवा केळी. कुपाडी मागुन हळुच डोकावणारे लालचुटुक जास्वंद ... ती सडेतोड पण तितकीच प्रेमळ माणसं. डोंगर कडांवर बहरलेले आंबे फ़णसं. तो नजर न ठरणारा अफाट सागर .. त्याच्या त्या खळाळत्या लाटा अन फ़ेसाळणारं पाणी. त्यात दूर वर अंधुक होत जाणाऱ्या होड्या. नटखट बालकासारखं ते बुडतं सूर्य बिंब. दर क्षणाला रंग बदलणारं आभाळ आणि सागराचा अथांगपणा ज्याच्यापुढे इवलूसा भासवणारा त्याचा अपार विस्तार. आणि या सगळ्यात असून ही न दिसणारा पण आत कुठेतरी खोलवर जाणवू लागणारा तो - मन आनंदाने उधाणून टाकणारा तो - सर्व साक्षी सर्व व्यापी सर्वेश्वर ! ही सगळी अनुभूती देणाऱ्या हे मातृभूमी कोकण तुला कसा विसरू ? By - डॉ. प्रसाद फाटक पुणे.