पुढे ठाकला पांडुरंग
येथेच माझा नारायण केशव विठ्ठल पांडुरंग प्रकटला -
हे तर अल्बम मधून शोधून काढलेले जुने फोटोज आहेत. दिवे आगर या गावातले. सलग ५ किमीचा स्वच्छ, सुंदर आणि शांत किनारा लाभलेले कोकणातील एक गाव.
मावशीच्या घरातून निघाल्यावर दोन्ही बाजूला अशा उंच उंच माडाच्या वाड्यांमधून जाणारा लाल मातीचा वळणांचा रस्ता. मग भगवान विष्णूंचं एक सुंदर मंदिर. मग लागतंय केतकीचं हिरवं पिवळं बन आणि मग येतो कधी एकदा डोळे भरून पाहतो असा पण डोळ्यात न मावणारा तो अथांग सागर. तो दिसतानाच काय पण आता तो क्षण आठवताना सुद्धा मनाला आनंदाचे उधाण येतंय.
एक काळ असा होता की या किनाऱ्यावर मी तासन् तास बसलेलो आहे. कधी कधी अगदी एकटाच... संपूर्ण पाच किलोमीटरच्या स्ट्रेच मध्ये दुसरा एकही माणूस नाही मी एकटाच माणूस आहे... असं पण घडलेले आहे.
तर असाच एका सुंदर सकाळी ह्याच किनाऱ्यावर पोहोचलो. आधी थोडं पाण्यात चालणं - पळणं झालं. वाळूच्या एका छोट्याशा उंचवट्यावर बसून पाण्यात पाय सोडले आणि शांतपणे बसलो. दर मिनिटाला किनाऱ्यावर आदळणाऱ्या शुभ्र फेसाळत्या लाटांनी अंगावर काटा येत होता. त्यानंतर लक्ष गेलं ते किनाऱ्यापासून आत दूरवर पसरलेल्या शांत खोल गंभीर समुद्राकडे आणि तशीच नजर क्षितिजापर्यंत गेली आणि सुरू झाला एक वेगळाच खेळ. सागराच्या अथांगतेला आव्हान देणारा आकाशाचा विस्तार डोळ्यात मावेना. आता अचानक तिथेच प्रगट होऊ लागला माझा नेहमीच्या ध्यानातला विष्णू आणि बघतो तर काय तो क्षणाक्षणाला मोठा होत गेला. त्याने आकाशाला गवसणी घातली. अनंता अपार अफाट स्निग्ध नजरेचा नारायण!
तेंव्हा पहिल्यांदाच त्याचे असे विश्वरूप दर्शन झालें... म्हणजे कुठलाच चमत्कार किंवा साक्षात्कार नाही. उघड्या डोळ्याला जाणवणारा, मनातच काय पण गगनात देखील न मावणारा साक्षात भगवान समोर जाणवत होता. वर्णन करतोय खरा पण तो क्षण अवर्णनीय होता. नंतर असाच तो कधी ना कधी कुठे ना कुठे भेटत राहिला पण तो पहिला अनुभव मात्र अविस्मरणीय आहे.
कुठल्याच प्रकारचा शरीर, मन बुद्धी यावर ताण न पडता मिळणारा असा विशुद्ध आनंद मात्र नेहमीच्या नेहमी घेत नाही किंवा घेता येत नाही किंवा घ्यावासा वाटत नाही हीच माझी मानवीय मर्यादा!
पांडुरंगा आज कार्तिकी एकादशीच्या दिवशी हा अनुभव मनात दाटून आला आणि तो सर्वांसमोर मांडता आला हेही नसे थोडके. 🙏 🕉 🪷
Comments