लठ्ठपणा विषयी उपयुक्त माहीती चा लेख.
लठ्ठपणाचा संपूर्ण विचार :
obesity / fat body / स्थौल्य / जाडी वाढणे / वजन वाढणे.. हे सगळे शब्द आपल्या सगळ्यांच्या बोलण्यात / चर्चेत सतत येत असतात.
लठ्ठपणा ही एक मोठी समस्या असल्यामुळे त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असतं. वस्तुतः स्थूलता ही काही खूप मोठी समस्या आहे असा काही भाग नाही. कारण जाड असला म्हणजे अनफिट आणि बारीक असला म्हणजे फिट हे सुद्धा तितकसं बरोबर नाही. परंतु आयुष्यात पुढे लठ्ठपणामुळे काही गोष्टी मागे लागून आपल्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतात त्यामुळे फार लठ्ठ होऊ नये , झाला असले तर राहू नये हे अगदी नक्की.
आम्ही केशव आयुर्वेदिक चिकित्सालयातर्फे पूर्वी लठ्ठपणा वरती काम सुरू केलं त्याच्यामध्ये आयुर्वेदाप्रमाणे निदान, सल्ला व चिकित्सा असं सगळं केलं. काही पंचकर्माचा भाग देखील करत असू. पण नंतर लक्षात आलं की एवढं काही पुरेसं नाहीये.....म्हणजे पंचकर्म वगैरे केलं की बारीक होतं असेही काही नाहीये; मग उगीच खोटं सांगून पैसे कशाला मिळवायचे? म्हणून मग आम्ही त्यावर काम करतो हे सांगणं बंद केलं.
मात्र रोजच्या प्रॅक्टिस मध्ये आपल्याला लठ्ठपणाचा विचार करावाच लागतो. त्यामुळे सतत अभ्यास चालू राहिला. हल्लीच्या काळात थोडासा मॉडर्न चा दृष्टिकोन देखील लक्षात घेतला. हल्ली मुलांकडून gen z च्या आणखीन काही गोष्टी कळल्या. शिवाय ' आहार आजार आणि आयुर्वेद ' हे असताना आयुर्वेद शास्त्राचा देखील या विषयावर सखोल अभ्यास झालाच होता.
या सगळ्या आधारावर आणि रुग्णांकडून येणाऱ्या अनुभवावरून असं म्हणता येईल की;
असा कुठलाही आहाराचा एक निश्चित प्लॅन सांगता येणार नाही की ज्याच्यामुळे स्थूलता कमी होईल. कारण काहींना हा प्लॅन झेपत नाही तर काहींना तो प्लान झेपत नाही.
त्यामुळे जरी अगदी आहार तज्ञ किंवा डाइटीशियन म्हणून माझ्याकडे कोणी येत नसलं तरी देखील सहज विचारलं तर सर्वाचा साकल्याने विचार करून मी सल्ला देत असतो. याच्यामध्ये आहार व व्यायाम यांचा त्या व्यक्तीच्या प्रकृती प्रमाणे विचार करावा लागतो... तसा आपण करतो. गरज असेल तर औषध देखील आपण देत असतो.
आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे की; औषध अन्न आणि विहार यांचा एकत्रितपणे केलेला विचार हाच संपूर्ण आरोग्यासाठी सुखावह होतो.
काही ठळक मुद्दे तुमच्यासमोर ठेवतो :
●१ बारीक व्हायचं असेल तर हालचाल भरपूर हवी, व्यायामही हवा.
●२ जर स्थुलाहून ही अति स्थूल झालेले असाल तर पोळी भाकरी भात या प्रकारचे स्टेपल फूड सुद्धा कमी ते बंद करावे लागू शकते.
●३ स्वतःची कधीच उपासमार होऊ द्यायची नाही . वेळच्या वेळी शरीराला पोषक आहार द्यायलाच हवा. न खाल्ल्याने देखील वजन वाढते.
●४ Fibres म्हणजे भाज्या किंवा कोशिंबिरीचे पदार्थ आवश्यक आहेत.
●५ प्रोटीन / नत्रजन्य पदार्थांची शरीरास गरज असते.
●६ शाकाहारी असाल तर दुधाची / दुग्धजन्य पदार्थांची गरज आहे.
●७ 💥 आहार किती वेळा घ्यावा हा एक कळीचा प्रश्न आहे. तर आयुर्वेदाने आहारस्य द्वौ कालौ म्हणजे आहाराचे दोन काळ असे सांगितले आहे. म्हणजे जेवणे दोन. परंतु छोटी न्याहरी ला प्रतिबंध नाही.
🔥 प्रत्येक माणसाची त्याच्या त्याच्या प्रकृती प्रमाणे अन्नपचनाची क्षमता वेगळी असते; त्यामुळे अग्नी विचार हा प्रधान ठरतो.
♡ ज्यांची पित्त प्रकृती असेल त्यांनी तीन वेळा खाणे गरजेचे आहे.
♤ कफ प्रकृतीच्या माणसाला दोनदा च खाणे पुरेल.
♧ तर वात प्रकृतीच्या माणसाच्या खाण्याबद्दल ठरवणे कळीचे असते त्यामुळे मी ते इथे सांगू शकत नाही. म्हणजे काहीतरी सिक्रेट सांभाळून ठेवायचं म्हणून नव्हे तर सांगायला खूप अवघड आहे. ते त्या व्यक्तीशी बोलूनच ते ठरवावे लागते.
●८ सारखे चरणे हे कुठल्याच प्रकृतीच्या माणसासाठी बरे नव्हे.
●९ केवळ औषधे खाऊन कधीही कोणीही बारीक होत नाही. याबाबत औषधेही सपोर्टिव्ह रोल मध्ये असतात.
●१० मानसिक आरोग्याचा देखील लठ्ठपणाशी संबंध येतो आणि काही जणांना लठ्ठपणा आल्यामुळे मानसिक आजार येतात.
●११ थायरॉईड असेल तर वजन वाढतेच. त्यावर इतर उपाय शून्य महत्त्वाचे होतात. थायरॉईड कंट्रोल ठेवणे. हे प्राथमिक गरजेचे ठरते.
●१२ BMI काढणे, body fat मोजणे, cholesterol check करणे या गोष्टींचाही गरजेनुसार अभ्यास करायला हरकत नाही.
सर्वांगीण विचार करून आधी झाडांना होता आपले प्रकृती सांभाळावी एवढेच विनंती.
आपला; वैद्य प्रसाद फाटक पुणे.
9821697288
Comments