one literary try here.
क्षण एक पुरे जगण्याचा !
रोज सकाळी उठल्यावर आपण कितीतरी गुड मॉर्निंग चे मेसेज वाचतो आणि ती गुड असते देखील पण आजची रविवारची माझी सकाळ व्हेरी व्हेरी स्पेशल झाली ।
हल्ली रोज मी चक्क पहाटे उठून टेरेस वर जातो आणि व्यायाम करतो । लै धमाल असते राव । पण आज रविवार म्हणून व्यायामाला जरा सुट्टी घ्यायचा विचार आला / पण टेरेस चा विचार काही स्वस्थ बसू देई ना ... मग ठरवलं मस्त पैकी चहा घेऊन वर जाऊ या मग काय लग्गेच अंमलबजावणी ।
मी चहा, सतरंजी, सॅनीटाईझर अशी सगळी गॅंग पोचलो वर ।
आहाहा काय क्षण पकडलास पश्या, मी स्वतःलाच शाबासकी दिली ।
मंद वारा, पक्षांचे थवे चिवचिवत आहेत आणि नुकताच वर येणारा तो पूर्वेचा लाल मंद तेजाचा गोळा आणि हातात चहाचा कप.... खल्लास दिल खुश हो गया ।
माझे व चहा चे कित्येक क्षण असे गुगल फोटोज वर नसतील पण या मानेवरच्या कम्प्युटर ला असे काही फीड आहेत ना की बस ! त्यात मुख्य आहे पन्हाळ्याच्या तबक बागे समोर च्या टपरी वरचा चहा । मी एवढ्याशा कपातुन घुटके घेतोय, समोर नाना प्रकारचे पक्षी मंडळी ये जा करताहेत, हर प्रकारचे आवाज आणि त्यांचे जमिनीत चोच खुपसून दाणे टिपणे । आणि मग पुन्हा 7 वर्षांनी त्याच ठिकाणी मी, बायको आणि मोठा मुलगा बसलोय; मी चहा घेतोय आणि असा काय पाऊस आला ना की खल्लास । पुढे एकदा पाचगणी ला गावात सगळं बंद असताना गावाबाहेर शोधलेल्या टपरीवर मिळालेला आणि बाहेरच्या गारव्यात अगदी हवाच असणारा तो एक चहा । इस्कॉन मंदिरात दर्शन घेऊन मग अरोरा टॉवर्स ला मंद प्रकाशात पेपर वाचताना घेतलेला चहा । पाहिल्यांदाच धाकट्या मुलाला घेऊन गेलो असताना फाईव्ह स्टार ला घेतलेला महागडा चहा । बास फाटक बास ...
काही क्षण असे असतात ना की ते असेच का ते माहीत नाही पण मेंदूच्या कंप्युटर ला फीड होऊन जातात । आणखी ती एक मस्त सकाळ होती मुन्नार च्या हॉटेल च्या टेरेस वर जाऊन असाच एक मस्त सूर्योदय पाहिला होता आणि मग मोबाईल वर पकडला आणि फोटो लगेच पोस्ट पण केला । लगेच reply आले. कधी एकट्यालाच खूप भारी वाटतं तर कधी एकांतात देखील virtually स्नेह्यांशी बोलायला छान वाटतं. माहीत नाही का ते पण ती सकाळ पण अशीच मेमरी ला फीट झाली ।
तर असा मी आज टेरेस वर हातात चहाचा कप, केसरीया भगवान वर वर येताहेत , त्यांच्या समोरून पक्षांचे थवे नाचताहेत । अगदी सूर्य बिंबाला भेदून जाणारे मोजके पक्षी किती सुंदर दिसतात म्हणून सांगू । त्यांचे अनेकविध आवाज आणि प्रकार मंत्रमुग्ध करून टाकत होते ।
समोरच्या दृश्याने डोळे , वाऱ्याच्या स्पर्शाने त्वचा, चहाच्या चवीने रसना आणि पक्षांच्या आवाजाने कान अगदी तृप्त होत होते । चार महाभूते आणि त्यांचे चार विषय यांचे असे चार इंद्रियांना लूभावणे चालू होते । आणि हो त्याच क्षणी जसा दृष्टीभ्रम असतो तसा गंधभ्रम झाला की काय माहीत नाही, अचानक दक्षिणेच्या डोंगराकडून निलगिरी सारखा एक सुगंध माझ्या नाकापुड्यानी भरून घेतला !... पाचवे इंद्रिय पण तृप्त झाले । मन पुन्हा भूतकाळात गेलं ....
आमची मधुचंद्राची ट्रिप.... आमच्या बस ने घाटातून एक सफाईदार वळण घेतले आणि तोच तो गंध असाच नाकात भरून राहिला होता .. हो निलगिरी / यूकॅलिप्टस च ते । आज 25 वर्ष झाली अजून तो माझ्या डोक्यात तसाच्या तसा ताजा आहे ।
आणि दुसरा गंध माझ्या गोव्याच्या भूमीचा , तिच्या मातीचा आणि अशाच मे महिन्याच्या दिवसात पसरणारा तो पिकलेल्या काजूच्या फळांचा काहीसा मादक गंध । मे महिन्यात घाट उतरून पहाटेस सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरायला लागलो की तो नाकात भरतो. स्वर्ग सुख म्हणजे तेच दुसरे काय ?
त्यामुळे मी तर नेहेमी म्हणतो की मला दारू ची काही गरज नाही, काजू फळांचा तो वासच मला इतका चढतो !
Cut to present moment मी ट्रॅव्हल xp च्या त्या स्मार्ट होस्ट प्रमाणे दोन्ही हात फैलावून म्हणालो ' f****** all ...I am on the top of the world '
अर्थात यातलं f...... हे माझं आहे बरका, इतर सिरीयल आणि सिनेमात ते चालत असलं तरी ट्रॅव्हल XP ला असलं काही allowed नाही !
मला वाटलं की हा पूर्वी कधी च मेंदूत नसलेला f*** कुठून आला असेल राव ? तर तो असेल झुगारून देण्याचा । त्या क्षणी सगळ्या खालच्या जगातल्या चिंता, जबाबदाऱ्या मी झुगारल्या होत्या । आणि नेमकं त्याच क्षण मी म्हणालो ' हा क्षण एक पुरे जगण्याचा मग वर्षाव पडो मरणाचा '
पण जिवलग मंडळींनो - टेन्शन नॉट ... अत्युच्च आनंदाला अशी सार्थकतेची झालर असते आणि ती त्या क्षणा पुरतीच असते... जसे वैकुंठ पुणे स्मशानात तुकारामाचा अभंग वाचताना थोडा वेळ वैराग्य येते अगदी तसे ।।
मग सतरंजीवर आडवा पडलो या सगळ्या विचारांचे शब्दांकन सुरू झाले पूर्वी कथा लिहायच्या आधी जसे शब्दांकन करायचो तसे करत पडलो । आणि त्या विशाल अफाट आभाळाकडे बघताना मन मोठं होत गेलं ।
असाच तो सुरव्या द्येव, असेच विराट आकाश अनुभवताना च माणसाला / ऋषी मुनींना सर्व प्रथम त्यांचा भगवंत दिसला असेल का ?... असेलही.....
Comments