Ganabab
गणाबाब तेव्हा माझ्यापेक्षा जवळजवळ ३५ एक वर्षांनी मोठे होते. तसं म्हंटलं तर मराठीत त्यांचा अहो जाहो असा उल्लेख करावा लागतो आहे. पण आमच्या कोकणीत मात्र माणूस कितीही मोठा असला तरी त्याचा उल्लेख एकेरीतच केला जातो. त्या भाषेत त्यामुळे एक वेगळीच आपुलकी, समानता वगैरे असावी असे वाटू लागते.
संघाकडे काही लोकं विनामुल्य काम करणारे लोकं असतात त्यांना प्रचारक म्हणतात. हे लोकं निस्वार्थ पणे देशसेवेसाठी घर सोडतात. मी आपला १/ १.५ वर्षच घर सोडून प्रचारक म्हणून गेलो आणि मला गोव्यात पाठवण्यात आले. तिथे वाल्पोई हे अगदी स्वप्नातले गाव असेच म्हणता येईल असे एक गाव आहे तिथे मला ठेवले होते. आणि इथेच गणाबाबशी माझी पहिली ओळख झाली.शांतादुर्गेच्या शाळे जवळ एक शाखा होती. त्या शाखेत मला कोणीतरी घेवून गेलं.तो परिसर इतका नयनरम्य होता कि माझ्या आनंदाला पारावर उरला न्हवता! सगळीकडे नुसतं हिरवेगार, एकीकडे डोंगर, दुसरीकडे उतारावर नारळ पोफळीच्या वाड्या, अशातच डोंगरावरून येणारे छोटे अवखळ झरे! शाखा सुटायच्या अगदी पाच मिनिट आधी एक वयस्कर व्यक्ती वय असेल ६० च्या आसपास, हळूहळू चालत आत येताना मला दिसली. बुटकी असून ती व्यक्ती थोडीशी वाकली होती पूर्वीच्या गोरेपणाच्या खुणा चेहेर्यावर ती वागवत होती.तरतरीत नाक आणि घारे असून विझलेले डोळे; काळजाला भिडत होते. शाखा सुटल्यावर कोणीतरी ओळख करून दिली. गणाबाब देसाई हातांची बोटे एकमेकात गुंतवून नम्रपणे नमस्काराच्या अवस्थेतच उभा होता. मी प्रचारक आहे म्हंटल्यावर त्याला विलक्षण आनंद झाला. तो त्याच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसत होता. अतिशय आग्रहाने तो मला घरी घेवून गेला. तशाच डोंगरातल्या नागमोडी रस्त्यावर फर्लांगभर चालल्यावर डावीकडे एक अतिशय उंच जोत्याचा चिरेबंदी वाडा होता. रंग उडाला असला तरी त्याची भव्यता डोळ्यात भरण्यासारखी होती. जवळजवळ १५ पायऱ्या चढून आम्ही दारात आलो पुढे खन्दकासारखा एक खोलगट भाग ओलांडून पुन्हा एक दार लागले तिथून खरा वाडा सुरु झाला. 'आमचे पूर्वज सतत लढायांवर असत त्यामुळे सुरक्षेसाठी हा खंदक ' बाब सांगत होता. मधोमध अनेकविध फुलांची, फळांची बाग आणि तीन बाजुनी खोल्या पण एकीकडे चीनच्या भिंतीसारखी भिंत अशी आत रचना होती
.'पलीकडे चुलत भाऊ राहतात पण त्यांच्याशी आमचा काही संबंध नाहीये'
तिकडे असला तरी माझ्याकडे त्यांनी आड पडदा ठेवला न्हवता.गोमंतकीय अगत्याचा पुरेपूर धबधबा गणबाब मध्ये कोसळत होता. तो सतत काहीना काही सांगत होता.
त्यानंतर प्रत्येक वेळेला ती शाखा केली कि त्याच्याकडे जाणे आणि जेवण खाण करूनच मुक्कामी परतणे हा शिरस्ताच होवून गेला दरवेळी त्याचे नवनवे पैलू दिसत होते.पूर्वजांचा अभिमान, स्वतः काही करू न शकल्याची खंत, संघ आणि देशाबद्दल नितांत प्रेम असे काहीसे मिश्रण त्यात होते. मिश्रण म्हंटलं कारण असं कि त्यांचे पूर्वज राणाच्या बाजूने नव्हे तर पोर्तुगीजांच्या बाजूने लढत असत त्यांनी यांना दिलेली विश्वासराव हि पदवी बाब मोठ्या अभिमानाने आडनावाच्या आधी लावायचा.
'गणेश विश्वासराव देसाई असे लिही रे ' तो पत्ता देताना म्हणाला.
'विश्वासराव?'
' हो ती आम्हाला पोर्तुगीजांनी दिलेली पदवी आहे बरे का! ' त्याने अभिमानाने सांगितले.
मी जरा चमकलोच पण सरळ तसे बोलता येईना! केव्हातरी संधी बघून मी ते विचारलंच.
तेव्हा म्हणतो कसा ' अरे काही झालं तरी आमच्या वाडवडलांचा पराक्रम आम्ही कसा विसरू ? तुला माहित नाही पोर्तुगीजांच राज्य म्हणजे काय वचक होता सगळ्यांवर! चोरी नाही मारी नाही सगळं कसे सुशेगात ' झोपाळ्यावर अलगद झोका घेत तो बोलला.
गणाबाब नुसता बोलका पंडित आहे झाले, गावात चर्चा असे,
'काही करणे ना धरणे ३\३ मुली लग्नाच्या आहेत; कसं काय करणार आहे कोण जाणे' लोकं म्हणत.
बाबला काळजी होतीच पण तसं तो काही फारसे करू शकत न्हवता. एकापेक्षा एक सुंदर आणि हुशार मुलींचा बाप होता तो; पण म्हणून इकडच्यासारखा उगीच त्यांना झाकून ठेवणारा न्हवता. त्याच्या नशिबाने ते दोन गुण मुलींना तारक ठरले आज त्या सगळ्या नोकरी करून सासरची घरं त्यांच्या आईप्रमाणे मस्त सांभाळत आहेत.बाबची बायको पण त्याला साजेशी, घरात दाणा नसे नाका, आल्या गेल्याचं हसत मुखाने स्वागत करेल, जेवू खाऊ घालेल आणि मगच पाठवेल.
जेवण झाल्यावर वरच्या मजल्यावर विश्रांतीला जायचं पण झोपायचं नाही. त्याला गीता वाचून दाखवायची आणि त्यावर तो काहीतरी विचारायचा मी काही जाणकार नव्हे पण काहीबाही सांगून पुढे सरकायचं असं चाले. मग नकळत त्याचे डोळे बंद झाले कि मी पण ताणून द्यायचा.सामान्य हिंदुप्रमाणे बाब देखील देवभोळा होता. भगवंताचे नाव सदा मुखी असे.
अशीच एक उदासवाणी संध्याकाळ त्याच्यासोबत गप्पा मारत शांतादुर्गा शाळेच्या कट्ट्यावर बसलो होतो. शाखेची मुले घरी गेली होती.रस्त्यावर चिटपाखरू न्हवते समोरच्या उतारावरच्या झाडांवर डोंगराच्या सावल्या गडद झाल्या होत्या. बोलता बोलता त्याचा गळा भरून येतो आहे असे वाटत होते. शेवट मनाचा हिय्या करून मी त्याला विचारले आणि त्याचा बांध फुटला.
' भावाने आज फार मारलं रे 'तो कसेबसे बोलला.
'कोणाला?'माझा प्रश्न.
'आईला ' बाबने उत्तर पूर्ण व्हायच्या आतंच अश्रू ढाळायला सुरुवात केली होती.
मग त्याने सांगितले ते धक्कादायक होते. भावाची पण आर्थिक स्थिती खराबच होती पण त्याला दारूचे व्यसन होते आणि त्या भरात तो आईला कधीकधी मारत असे, तिचे वयही तेव्हा ७५ च्या पुढे असेल. तरी ती बिचारी त्याचे सगळे करायची. मागच्या दोन खोल्यात ते दोघे राहायचे.
' मी काही करू शकत नाही रे, तो अजिबात जुमानत नाही आम्हाला. प्यायल्यावर तर असा जोर संचारतो कि काही विचारू नकोस. या एवढ्या मुली झाल्या त्या ऐवजी एखादा दांडगट पोरगा झाला असता तर किती बरे झाले असते'
मी पण पडलो सदाशिव पेठी तरी म्हणालोच' अरे काय काळजी करतोस आपल्या शाखेचे ४\५ तरुण गोळा करू या कि '
त्यावर तो घाई घाईने बोलला ' नको रे बाबा माझ्या लेकरा [ त्याने माझा आपुलकीचा भाव ओळखला असावा ] असे काही करू नको, गावात नालस्ती होईल आणि तिचा त्रास आणखीच वाढेल तो वेगळाच. '
माझे त्या गावाचे काम संपले आणि मी पुणे जिल्ह्यात परत आलो तरी गणा बाबशी पत्राने संबंध होताच शिवाय ५\६ वर्षांनी आवर्जून जाऊन यायचो. गेलो कि पहिली चक्कर त्याच्याकडे असायची. त्याच्या मुलींच्या लग्नाच्या पत्रिका त्याने आठवणीने पाठविल्या होत्या. गेलो कि नाराजी असायची
'आला नाहीस रे लग्नाला ?'
पण आता हळूहळू तो थकत चालला होता.
एक वर्षी मी उत्साहातच त्याला हाक मारत घराचा खंदक ओलांडला त्याची बायकोच पुढे आली, काही तरी चुकल्यासारखे वाटले'
'ये रे ' ती म्हणाली
'बाब? ' मी पुन्हा प्रश्नार्थाने हक दिली
'तो काय तिथे बसला आहे ' मी पुढे गेलो. झोपाळ्यावर तो बसला होता हळूच झोका होता नव्हता. त्याच्या डोळ्यात ओळख दिसत नव्हती
'किते झाला?' [काय झाले?] मी घाबरून विचारले.
बाबने मला ओळखले नाही उत्साहने स्वागत केले नाही हा एक धक्का होता. "तुझ्यासाठी येतो रे मी बाब एवढ्या ४०० मैलावरून! काहीतरी ओळखीची खूण दे" पण तो त्या सगळ्याच्या पलीकडे पोचला होता. तिने मला आज खुर्ची दिली, स्वतः घेतली आणि त्याच्या समोरच ती सांगू लागली
'काय सांगू रे बाबा त्याची आई गेली आणि हे असे झाले बघ '
'पण आई तर खूप वयस्कर असणार एवढा धक्का का घ्यावा?'
' आईने मागल्या विहिरीत जावून उडी घातली रे बाबा, त्या कर्दन काळाच्या जाचाला कंटाळून आम्हाला पत्ता सुद्धा नाही सकाळपर्यंत सगळं संपलं होत. एकदाच बाब जोरात हंबरडा फोडून रडला ते शेवटचे, आता आसू नाही, ओळख नाही, काही राहिलं नाही क्वचित मला ओळखतो तेव्हढेच'
बाबची गीता जागच्या जागी मुकी झाली होती. तशाच विमनस्क अवस्थेत मी गाव सोडले.
थोड्याच दिवसात गणाबाब गेल्याचे कानावर आले!!!
Comments
गणाबाब हे एक बोलके व्यक्तिचित्र आहे.
पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, गोनिदा, अशा सिद्धहस्त लेखकाने लिहिल्यासारखे!
अनुभवाचे बोल मनाला भिडतात. परिणामकारक होतात.
फारच छान!
आता एक करा, लिहिते रहा.
अनेक रुग्णांना हे औषधही उपयोगी पडेल.
जीवनाच्या विविध क्षेत्रातील रंग दाखवा.
- श्रीकृष्ण (rajan) जोशी