मन स्वस्थ राहावे म्हणून काय करायचे ?
मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व ची ची -
हे समर्थांनी सांगून ठेवलं आहे. पण काय काय करायचं यावर ?
तर असं आहे की धर्म हा सांगायला फार सोपा पण जगायला फार अवघड असतो. तुम्ही कुणाला सांगा किंवा नका सांगू पण आचरण मात्र जरूर करा असे साधू संत सांगतात. मी माझ्या पहिल्या आणि कधीच प्रकाशित न झालेल्या कथेला नाव दिले होते ' आकाश माती ' प्रकृतीचा व आत्म्याचा एक अंतस्थ संघर्ष जो माझ्या आत सतत चालू असतो. तो तुम्हा प्रत्येकाच्या आत ही असतोच. मनाला सारे काही हवे असते जे त्याला किंवा त्याच्या मालकाला म्हणजे आपल्याला त्रासदायक असू शकते. उदाहरण द्यायचे तर प्रमेही [ diabetecic ] व्यक्तीला गुलाब जामून ! त्याचे मन म्हणते आणा येऊ द्या. एक / दोन खाऊन काय बिघडणार आहे ? आणि सत्य असते की थांबा नका खाऊ. यात जिव्हा जिंकली की विनाश आणि आत्मा सत्य जिंकले की लाभ असतो. म्हणून ही आकर्षणे म्हणजेच विषय कंट्रोल करायला हवेत. धर्म हा हे सत्य सांगतो त्यामुळे तो कडु पण वाटतो पटला तरी आवडत नाही. म्हणुन तर मनाच्या श्लोकातून स्वामीजींनी युक्ती सांगितली की मनाला एखाद्या लहानग्या बालकाप्रमाणे कधी आंजारून गोंजारून तर कधी कठोर होवून शिकवा. त्याला सरळ, चांगल्या आणि उपयोगी मार्गावर आणायला शिकवा. तोच प्रयत्न आपण करणे महत्वाचे आहे. तुम्हालाही हा मार्ग जर आवडला तर उपयोगी पडु शकेल !
आकाश मातीचा हा संघर्ष आत चालूच रहाणार किंवा एक दिवस कळणार की अरे सगळी आकर्षणे पण वास्तव आहेत आणि परमात्मा पण अंतिम सत्य आहे. जीवनात या दोहोंचा बॅलन्स हवा.
यथा योग्य प्रमाणात आहार, नैतिकतेची लैंगिकता, योग्य मार्गाने मिळणारे धन हवेच. पण चुकीच्या मार्गाने / अति हव्यासाने ओढुन घेतलेत तर ते चुकीचे तर आहेच शिवाय तुम्हालाही हानीकारक आहे. म्हणुन विषय वासना ताब्यात ठेवायला जे स्वामीजी सांगतात. ते न ऐकल्यास दुर्धर व्याधी होवू शकतात. पर स्त्रीवर आक्रमण केल्याने कायद्याच्या कचाट्यात सापडाल. भ्रष्ट धन कमावलं तर ED मागे लागेल असे बरेच काही. आणि मग जनी सर्वत्र मानहानी म्हणजेच ची ची होऊ शकते. सावधान !
निवेदक : वैद्य प्रसाद फाटक, शिवानंद प्रबोध मंडळ पुणे 2
Comments