The God particle. ईश्वर तत्त्व.
The God particle.
ईश्वर वस्तु...
आता इथे ईश्वर वस्तु असा शब्द वापरल्यामुळे काही जण नाराज होतील. परंतु खुद्द ज्ञानेश्वर माऊलींनी हा शब्द वापरलेला आहे. विषय वस्तु म्हणजे या जगातील सर्व भौतिक गोष्टी तर ईश्वर वस्तु म्हणजे ते परब्रम्ह परमात्मा चैतन्य असा विषय आहे.
आज जगामध्ये अनेक लोक वेगाने नास्तिक होत आहेत. मुसलमानांना नास्तिक होणं सोपं आणि सोयीस्कर नसल्यामुळे ते एक्स मुस्लिम होत आहेत. या पार्श्वभूमीवर या ईश्वर वस्तु बद्दल बोलणं योग्य राहील.
अर्थात जर कोणी नास्तिक असेल तर काही अडचण नाही. तो त्याचा विचार आहे. त्याला मी काही पाखंडी म्हणत नाही. मी त्याच्याविरुद्ध काही कमी अधिक करायची इच्छा ठेवत नाही. माझ्यासारख्या अनेकांशी जो ईश्वराचा संबंध येतो तो कशासाठी आहे? आणि त्याचा उपयोग काय आहे? एवढंच फक्त मी आपल्यासमोर ठेवणार आहे.
काहींच्या मते ईश्वर हे अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मानवाची कल्पना आहे. तर काहींच्या मध्ये ध्यानावस्थेत सापडलेले ते एक तत्त्व आहे. अर्थात या दोन्हीपैकी काहीही असलं तरी फारसा फरक पडत नाही. कारण ती एक कल्पना आहे असं मानायला जागा आहेच. आणि तो अनेकांचा प्रत्यक्ष अनुभव असेल तरी हरकत नाही. सर्वसामान्य माणसाला, आज असलेल्या साडेआठ बिलियन लोकांना मात्र तो ध्यानावस्थेत सापडलेला. . ऋषिमुनींना सापडला तसा नाही दिसलेला. आपण सामान्य माणसं त्याला ऋषी मुनी, मोहम्मद पैगंबर, जीजस यांनी सांगितलेल्या कल्पने बरहुकूमच ओळखतो.
आता शास्त्रज्ञ देखील त्याला शोधत असतात आणि कधीतरी त्यांना गोॅड पार्टीकल किंवा बोसान सापडतो. तर त्याचा अर्थ की जगाची निर्मिती कुठल्या एका कणातून झाली तो कण कसा असेल हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जगन् निर्माता म्हणजे ईश्वर या संकल्पने चा तो सखोल शोध आहे असे म्हणता येईल.
आता आपल्या हिंदू धर्मानुसार ईश्वर म्हणजे काय ते बघूया तर त्याचं दोन प्रकारे वर्णन केले गेले. शुद्ध अद्वैती तत्त्वज्ञानानुसार त्यातले पहिलेच खरे आहे आणि मीही ते मानतो. ब्रह्म सत्यम्.
ते म्हणजे कसे तर तो निर्गुण निराकार आहे. अनंत अपार सर्वसाक्षी आहे. तो काहीच करत नाही. त्याला कशाचा लेप लागत नाही, त्याला कोणी तोडफोडू, जाळू शकत नाही.
दुसरं म्हणजे तो सगुण साकार आहे. त्याने जगाची निर्मिती केली. तो सगळ्या जगाचा नियंत्रण आणि नाश करणारा देखील आहे.
तर माझ्यासाठी हे अवघं अस्तित्व म्हणजे अख्या ब्रह्मांडाला पुरून दशांमुळे उरलेला असा तोच परमेश्वर आहे. सर्वव्यापी, त्रयस्थ, खूप प्रचंड मोठा, तो नाही असे ठिकाणच नाही असा तो.
तरी पुढे प्रश्न आहेच की परमेश्वर म्हटल्यानंतर मला त्याचा काय उपयोग ? तर त्याच्या अभ्यासाने, त्याचा विचार केल्याने, ध्यान केल्याने माझं मन मोठ्ठं होतं. माझ्या मनातील भय, भीती कमी व्हायला मदत होते. एवढ्या अफाट अस्तित्वात मी नगण्य आहे म्हणल्यानंतर अहंकार कमी होतो. आणि दुसरीकडे त्याला जर सर्व काही करणारा असं मानलं तर जे काय करतो ते तोच करतो.... असं म्हणून प्रत्येक गोष्टीचा मला होणारा त्रास कमी होऊ शकतो. मी केलं म्हणण्याचा अहंकार कमी होऊ शकतो. मी जे काय आहे तो त्याच्यामुळे आहे. जे काय करतो ते सगळं तोच करतो. त्याच्या शिवाय दुसरे काहीच नाही; असे म्हटल्याने आपण हळूहळू शून्य होत जातो. आणि सर्व शून्य, महाशून्य हे जे बुद्धांनी म्हटले त्या महाशून्यामध्ये आपल्याकडे देखील अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं असे वर्णन आहे.
हा जो प्रचंड मोठा शून्य, चैतन्य गोल आहे ना त्यात एक शांतीची अवस्था आहे. त्याच्यामुळे मला एक चांगला मित्र मिळतो. मानवी नातेसंबंध हे आता खूप विसविशित होत चालले आहेत खात्रीशीर आणि कायमचा मित्र म्हणाल तर तो पंढरीराया हाच आहे.
.... आणि या दोन्ही रूपांमध्ये माझ्या मनाला त्याच्याशी जोडले राहण्यातून सुख, शांती, आनंद याचा लाभ होऊ शकतो. तोही असा की जो केवळ भौतिक जीवनातून, भौतिक गोष्टींतून मिळणार नाही.
Comments