पाश्चात्य संस्कृती नेमकी कशी होती? western culture.
पाश्चात्त्य संस्कृती म्हणजे नक्की काय याचा मागवा घेत होतो. अर्थात आज जे काही आपल्यासमोर पाश्चात्य जग उभं आहे; त्याला संपूर्णपणाने पाश्चात्य संस्कृती असे म्हणता येणार नाही. ती पाश्चात्य संस्कृतीची आजची व्हर्जन आहे. त्यामुळे पूर्व काळातील पाश्चात्त्य संस्कृतीचे काही ज्ञान होते का? असे बघत होतो. त्या संबंधाने जे काही थोडेफार वाचन झाले त्यातली ही काही पुस्तके आहेत. त्यांच्या अनुषंगाने निरीक्षणे नोंदवणार आहे. अधिकृत साहित्य हे निश्चितच समाजाचा आरसा असते. त्यामुळे या इंग्लिश क्लासिकल्स चा विचार त्या अर्थाने केला असता चुकीचा होणार नाही असे वाटते. जरी शंभर टक्के ठोसपणाने सांगता येत नाही; कारण काळ वेगळा आहे तरी चांगला अंदाज तर नक्की येत आहे.
यातले अर्थातच पहिले पुस्तक बायबल आहे. - 0001
सेन्स अँड सेन्सिबिलिटी व प्राईड अँड प्रिज्युडिस - 1805.
मग शांता शेळके यांनी अनुवादित केलेलं लिटल वुमेन हे अमेरिकन जीवनाबद्दल आहे 1868.
द पोर्ट्रेट ऑफ लेडी 1885.
चार्ली चापलीन जीवन चरित्र 1900 च्या पुढे.
डायरी ऑफ अना फ्रेंक 1939. या सर्वांमधून असं दिसतं की उच्च अभिरुची असणारी ही संस्कृती होती.
बेथलेहेम चा येशू ख्रिस्त हा तर धर्म निर्माता होता. अत्यंत करुणा असलेला होता. आणि त्याने जगाला प्रेम अर्पिले. जगासाठी खस्ता खाल्ल्या व जगासाठी मृत्यूही पत्करला. त्याच्या विचार व जीवनाचे प्रतिबिंब बायबल मध्ये पडले व पुढे शतकानुशतके चांगले वागणाऱ्या माणसांसाठी आज देखील ते आदर्शभूत आहे.
अमेरिकन असणारी लिटल वुमन ची लेखिका. त्या पुस्तकातून ती एका अत्यंत संस्कारक्षम अशा जोडप्याने त्याच्या चार मुलींवर केलेल्या संस्कारांचे चित्रण करते. त्यांना ते दोघे बायबल प्रमाणे नैतिकतेने व माणूसकीने वागण्यास शिकवतात. व त्या मुली देखील तशा प्रकारे आदर्श घेऊन तसे जीवन जगतात. याचे संपूर्ण चित्रण आहे. आणि एकीकडे असे आदर्श असताना त्यांना मोकळीकही पुष्कळ आहे. त्या कला जोपासतात, इतकेच नव्हे तर त्यांच्यापैकी एक जण नाटकात काम करते. असेही दिसते.
इंग्लंड मधील जेन ऑस्टेन च्या दोन पुस्तकांचा उल्लेख केला आहे. त्यातही समाजाचे जे चित्रण दिसते ते म्हणजे आपला जोडीदार स्वतः निवडणाऱ्या मुली. त्या बॅलेमध्ये पुरूष जोडीदाराबरोबर एकत्र नृत्य करून व संवाद साधून आपला जोडीदार स्वतः निवडतात. त्यातील काही मुली अत्यंत संवेदनशील व आदर्श जीवन जगणाऱ्या दिसतात.
इंग्लंड मध्ये लिहिलेल्या द पोर्ट्रेट ऑफ लेडी मध्ये एक स्वतंत्र विचारांची महिला जगप्रवासाची इच्छा धारण करून स्वतंत्र जीवन जगते. तिला भेटणारे जोडीदार किंवा तिला तिच्याशी विवाहबद्ध होऊ इच्छिणारे पुरुष हे देखील अत्यंत विनयशीलतेने प्रपोज करताना दिसतात. तिचा आजारी असणारा चुलत भाऊ आपण मरणार हे जाणून त्याच्या हिश्शाची प्रॉपर्टी वडिलांना तिला देउन टाकण्यास सांगतो व तसे देतो देखील.
अमेरिकी नागरिक चार्ली चापलीन याच्या चरित्रामध्ये त्याची माता ही तिच्यावर झालेल्या अनेक आघातांमुळे मनोरुग्ण झाली असून देखील; चार्लीला बायबल आधारित चित्रपट काढण्याचा आग्रह धरते व पुढे तो तसा काढतो देखील. जसे त्याचे चित्रपट संवेदनाशील दर्शक होते तसेच त्याचे हे मातृभक्ती, मानवता व जगा वरील प्रेम हे वास्तवात घडलेले आहे.
पोलंड ची 1935 नंतरच्या काळात तारुण्यात आलेली अना फ्रॅंक ही रोज डायरी लिहिते. त्यात तिचे पोलंड मधील रोजचे खरे खुरे जीवनच दिसते. ॲनाची वर्तणूक अशीच आदर्शाला गवसणी घालणारी दिसते. तिची स्वप्ने ही आपल्या घरातील भगिनी, कन्या यांच्यासारखीच होती. परंतु दुर्दैवाने हिटलरच्या दडपशाही मध्ये झालेली कुटुंबाची कोंडी व तरीही मूल्य जपण्याची तिची इच्छा व तिचा क्रूर शेवट वाचून हिटलरची चीड येते. तिचा मृत्यू आपल्या मनाला चटका लावून जातो.
या सर्व पुस्तकातील व्यक्तिरेखांमध्ये मॅनर्स व एटिकेट्सला ही भरपूर महत्त्व दिल्याचे दिसते.
ह्या पुस्तकांतून मला दिसलेली पाश्चात्य संस्कृतीच वर वर्णिल्याप्रमाणे काहीशी आहे.
ज्याला आपण भोगवाद म्हणतो. तशा प्रकारचे भगवादी जीवन ते दिसत नाही. अनेक बाबतींमध्ये तर ते माणूस म्हणून आपल्यापेक्षाही प्रगत होते - असेही वाटते. अर्थात काही बाबत आपण नक्कीच पुढे होतो आणि काहीबाबत ते देखील पुढे होते.
चांगली व वाईट माणसे या सर्व पुस्तकांमधून आपल्याला दिसतात. परंतु ती संस्कृती अत्यंत भोगवादी असल्याचे दिसत नाही. या सर्व पुस्तकांमध्ये पिसाट लैंगिकेतचे चित्र नाही, अतिरिक्त व्यसनांचे वर्णन नाही, खून पाडणे नाही, शिवीगाळ नाही....
यात निस्वार्थी, परोपकारी, संवेदनशील अशी माणसेच हिरो म्हणून दाखवली गेली. हे समाजाचे फार महत्त्वाचे प्रतिबिंब मला वाटते. वाईट माणसे सर्वत्र असतात पण त्यांना हिरो केले तर मोठी समस्या आहे. तसे असेल तर ती संस्कृती निकृष्ट आणि हल्ली नेमके सर्वत्र तसेच होऊ लागले आहे.
या पुस्तकावरील कव्हरवर मुलींचे जे रेखाचित्र दिसते; त्यातील कपडे हे देखील अंगभर असे दिसतात. याचा अर्थ असा नव्हे की - मी हाफ पॅन्ट घालून फिरण्यास असंस्कृत समजतो. बिलकुल नाही. पण झाकण्यासारखे अवयव त्या वेळेला झाकले जात होते. ही त्या वेळेची संस्कृती तिकडेही होती.
जशी जशी भौतिक प्रगती झाली काळ बदलला तसे तसे हव्यास, स्वार्थ, लालसा, खोटेपणा, ड्रग्ज, क्रूरता,अतिनग्नता असे दोष सुरू होऊन जगात देखील पसरले आहेत; असे मला वाटते. आपल्याकडे जेव्हा पाश्चात्य संस्कृतीशी फारसा संपर्क नव्हता अशा काळात गुरुचरित्र लिहिले गेले होते. त्यातही सांगितले आहे की; इथून पुढे कली माजणार आहे. आणि पुरुष लोक आपली जिव्हा व लिंग यांच्यावर ताबा ठेवणार नाहीत.
आलेल्या भौतिक प्रगतीमुळे हळूहळू सर्व जगच तसे बनत गेले आहे? त्यात कोणा एकाला दोष देणे फारसे बरोबर ठरेल असे वाटत नाही.
असो. जर या सगळ्या पाच सहा पुस्तकांचा जर पूर्ण मागवा घेत गेलो; तर हा लेख खूप आणखी मोठा होऊ शकेल. कारण त्या कथांमधून संस्कृतीचे दर्शन अनेक पैलूंनी घडतं. मग तर खूप लेखन होऊ शकेल. पण नाही. आपल्याला आत्ता ते करायचं नाहीये. गरजही नाही. त्यातला महत्त्वाचा जो इसेन्स होता तो मी आपल्यापुढे ठेवला.
आपल्याला काय योग्य वाटतं काय आयोग्य वाटतं? काय करायला हवं हे सगळं आपणच ठरवावं. 🙏🙏
Comments