माझे जीवन गाणे एक सहज अभिव्यक्ती भाग तीन :
माझे जीवन गाणे एक सहज अभिव्यक्ती भाग तीन :
यापूर्वी मी तुम्हाला दिवेआगरच्या समुद्रकिनाऱ्यावर मला कसा विश्वरूप दर्शनाचा अनुभव आला ते सांगितले.
खरे विश्वरूपदर्शन हे भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायामध्ये कृष्णाने अर्जुनाला दाखवलं होतं तेही आपल्याला माहिती आहे. आणखीन ज्यावेळेला यशोदा मातेने कृष्णाला म्हंटले की तू चोरून लोणी खाल्लं आहेस; चल आ करून दाखव. तेव्हा कृष्णाने मोठ्ठ तोंड उघडलं आणि मातेस सारं विश्व त्याच्यामध्ये दिसलं.
आपण कधी शांत बसलो किंवा ध्यानाला बसलो तर त्या विष्णूच्या आकारातून हळूहळू संपूर्ण विश्व कल्पनेत आणायचं. आमच्या गुरूंनी सांगितलं की आकाशावर ध्यान करा. इथे तर आकाश तुकड्यांनी दिसतं, तारांनी व्यापलेला दिसतं. म्हणून समुद्र काठावर ध्यान केलं. अफाट आकाश दिसलं त्याच्यामध्ये नारायण मोठा मोठा होत गेला. मग डोंगराच्या माथ्यावर जाऊन महाबळेश्वरला केलं. मग विमानात केलं. 11 किलोमीटर वरती गेलोय. ह्या सगळ्यातून असं लक्षात आलं की; जे आकाश आपण इथून खालून बघत होतो त्या आकाशात अकरा किलोमीटर वरती गेलोय तरीसुद्धा शेवट विस्तार एवढा की; आपल्याला विनाअडथळा दिसते म्हणून सगळे काही दिसणारच नाहीये. कल्पनाच करावी लागणार आहे!
जेव्हा जेव्हा आपण कुठेही अगदी आपल्या खोलीत जरी बसलो आणि आपलं आराध्य दैवत जे काय असेल आता माझा विष्णू आहे म्हणून त्याची मूर्ती डोळ्यासमोर आणली कि काही काळाने त्याच्यातून विश्व बघायला सुरुवात करायची.
माऊलीने म्हटलंय , ' ठाईच बैसोनी करा एकचित्त. ' कुठे जायची गरज नाही.
विष्णुसहस्त्रनामातलं सुद्धा पहिलं नाव काय असेल तर ' विश्व ' हे आहे! परब्रम्हाच्या परमेश्वराच्या हिंदुस्थानी कल्पनेमध्ये विश्व, युनिवर्स, ' सर्व काही ' याला खूप महत्त्व आहे. विष्णूच्या अनेक नावांमध्ये ' सर्व ' हे पण नाव आहेच. सर्व शर्व शिव: स्थाणू... असं त्यात आहे. म्हणजे परमेश्वराची जी काही कल्पना आहे, स्वरूपाची कल्पना आहे.. किंवा जे ' स्वरूप ' आहे त्यात संपूर्ण विश्व हा भाग महत्त्वाचा आहे. म्हणून ती कल्पना करायची. जेव्हा तुम्ही कल्पना करायला लागाल तेव्हा ते आवडत जाईल. अनेक डायमेन्शन्स आहेत. वर खाली कुठे कुठे बघायचं? उजेड बघायचा की अंधार बघायचा? त्यामध्ये तारे बघायचे की नाही? का आकाशगंगा बघायच्या? ...किती जमतंय हे महत्त्वाचं नाही. सुरुवात महत्त्वाची.१● त्यातून एक तर शांततेची, ध्यानाची सुरुवात चांगली होते.
२● परमेश्वराचे स्वरूप म्हणून पण समजून घेणंआवश्यक आहे. ३● तिसरं म्हणजे त्या अफाटामध्ये आपलं क्षुद्रत्व आपल्याला कळून येतं. आपल्या समस्यांचं क्षुद्रत्व आपल्याला कळून येतं. मग अहंकार गळून पडतो आणि ताणतणाव ही दूर होतो. असे सगळे फायदे त्याच्यात आहेत. करून बघा.
Comments