Gopi

नेमके सांगायचे झाले तर १९८४ साली मी संघाची शाखा चालवण्यासाठी गुरुवार पेठेतल्या एका गल्लीत जायला सुरुवात केली. अत्यंत मागासलेला असा हा एक भाग होता. बावन बोळ असे त्या भागाचे नाव म्हणजे इतक्या बारीक बारीक गल्ल्या एकातून दुसर्या फुटणार्या कि बाहेर पडणेच मुश्कील व्हावे. जंगलात जसा चकवा लागतो म्हणतात ना तसा लागायचा. ह्या बावन बोळात काही थोडेच लोकं संघाचे होते आणि मुख्य पगडा कॉंग्रेस वाल्यांचा. एकंदर लोकं गरीब, कमी शिकलेले आणि मेहेनत मजुरी करणारे. एखादे बेकार तरुणांचे टोळके कायम तिथे असणाऱ्या एका देवळाच्या पायऱ्यांवर बसलेले असे. शाखेत मुलांना तोटा नसे, भरपूर मुले पण एकापेक्षा एक अर्क, त्यांना शिस्त लावणे दूरच पण नुसते त्यांचे खेळ तासभर घ्यायचे म्हंटले तरी घाम फुटायचा. या आधीच्या शाखेत शिस्त लावण्यासाठी मुलाना फटका दिल्याने फारच समस्या झाल्या यामुळे इथे हात उचलायचा नाही असे मी ठरवलेलेच होते. त्यामुळे हे काम आणखीनच कठीण झाले, पण दुसर्या अर्थाने बरे झाले नाहीतर माझी काही धडगत नव्हती.
एक दिवस गल्लीच्या बाहेरून दुसर्या जवळच्या गल्लीतून एक नवीनच मुलगा आमच्या शाखेत येवून हजार झाला. गोपी अगदी गरीब घरचा होता त्याचे कपडे देखील साधेसुधे, रंगाला काळा, निरागस, बोलके डोळे, वय असेल १२ वर्षाचे . ' सर मी आधीच्या सरांच्या शाखेत पण होतो मला घ्याल?' गोपीने विचारले 'हो, का नाही?' मला फार आनंद झाला कारण शाखा आता आणखी पसरणार! हळूहळू गोपीची मला खूप मदत होऊ लागली कारण इतर मुलांपेक्षा तो खूप वेगळा होता. काही मुले तर तिथे त्रास द्यायला किंवा सातावायालाच यायची तसे त्याचे नव्हते त्याला काहीतरी नवीन शिकायचे, करायचे होते म्हणून तो येत होता. गोपी आल्यानंतर मुख्य म्हणजे त्याने त्याच्या गल्लीतून ४\५ मुले शाखेत आणायला सुरुवात केली तो त्या मुलांना जरा दाबत असे आणि शिस्तीत कसे राहायचे ते सांगे त्यामुळे त्या गटाचा दबाव आधीच्या तार्गत गटावर पडायला लागला. लहान लहान मुलांचा एक वेगळा गट करून तो त्यांचे खेळ घ्यायचा त्यामुळे मला पुष्कळ सोपे झाले.
' सर माझ्या घरी याल? ' आपुलकीने पण जरा भीत भीतच त्याने एक दिवस शाखा सुटल्यावर मला विचारले.' चल जावूया कि'म्हटल्यावर त्याच्या चेहेर्यावरच आनंद ओसंडून वाहत होता. बुरुड कामाचा धंदा असलेले ते एक छोटेसे खोपटे होते. दारातच त्याची आई टोपली विणत बसली होती. तिला माझ्याबद्दल बरीच माहिती असावी, फार आदराने तिने माझे स्वगत केले. अंधारे इवलेसे घरटे प्रेमाने ओथंबून वाहत होते. काळा चहा, जास्त साखर, दूध कमी फुटकी कप बशी कशाचेच काही वाटले नाही.मग अनेकदा तिथे जाणे झाले, दरवेळी तेच अगत्य तोच चहा बोलणे अगदी कमीच व्हायचे पण भावना पोचायच्या.
आणि तो काळा दिवस अंधाराला इंदिरा गांधींची निर्घृण हत्या झाली होती. संघाच्या नियमानुसार वरून आदेश आल्याशिवाय शाखा बंद ठेवायची नसते आजपर्यंत कधीच शाखेला सुट्टी दिली नव्हती.म्हणून मी शाखा भरवली, प्रसंगावधान राखून मी गीतेचा अध्याय सुरु केला. तिथले स्थानिक पुढारी आले, गुरकावून बोलले 'सर तुम्हाला काही कळतंय का न्हाई ? शाखा बंद करा अधी ' 'अहो पण मी फक्त गीताच घेतोय ' मी सांगण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकेनात तरी तशीच शाखा पूर्ण केली. प्रार्थना घेवून सोडून दिली.परिस्थिती ओळखून दुसर्या दिवशीपासून बरोबर ६.३० ला गोपी हजार होऊ लागला. त्याच्या गल्लीतली मुले पण हळूहळू येत पण पुढार्यांनी धमकावाल्याने बावन बोलतील मुले एकदम बंद झाली होती. गोपीच्या गटाची शाखा चालूच राहिली पण आता रोज देवूळ कट्ट्या वरचा गट येवून बडबड करायचा. खेळ घेवून द्यायची नाही. गोपीची बोटे माझ्या नकळत माझ्या हातात घट्ट रोवलेली मला जाणवली. हळू हळू तरुणांचा गट आम्हाला पूर्ण कडे करून उभा राहू लागला, गोपीचा गट देखील भीतीने आता येईनासा झाला. राहिलो फक्त मी आणि गोपी ! 'खाल्ल्या थाळीत हगतोस का रे मास्तर ? ' बंद कर हि तुझी नौटंकी ' एकीकडे निवडणुका पण जाहीर झाल्या होत्या अशा वेळी गल्लीत शाखा असणे सोयीचे नव्हते. पण तसे न म्हणता ते मी जी ३१ ऑक्टोबरला शाखा लावली ह्या अपराधाबद्दलाच दोष देत होते. शिव्या शाप द्यायचे. गोपीचा हात आता अधिकच घट्ट होत होता.
आणि एक दिवस अचानक शाखेतून जाताना ओळखीच्याच बावन बोळातल्या ३\४ तरुणांनी मला बोळापासून थोडे अंतर बाहेर आल्यावर घेरले. बाचाबाची केली आणि तोंड हातपाय सुजेपर्यंत मारहाण केली. आणि गम्मत म्हणजे मी हातपाय फिरवत प्रतिकार करत होतो पण माझ्या हातातला संघाचा दंड मात्र मी पाठीत घालण्यासाठी वापर शकलो नाही!
दुसर्या दिवशी तो काही बोलला नाही पण त्याला आलेला राग त्याच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसत होता. संघाचे मोठे प्रमुख शाखेवर काही आले नाहीत पण मला निरोप आला आणि मी त्यांच्याकडे गेलो ' हे बघ प्रसाद आता तिथे तुझ्या जीवाला धोका आहे आपण ती शाखा बंद करतोय ' तू पुन्हा तुझ्या घराजवळच्या शाखेत जायला लाग' मला काही ते पटत नव्हते पण मी गप्प राहिलो.
हा निर्णय सांगितला आणि गोपी एकदम रडायलाच लागला. त्याचे ते आसू म्हणजे माझ्यासाठी अनमोल असे आज तागायातचे सर्वात अनमोल मोती आहेत !
' नाही सर तुम्ही नाही जायचं मी तुम्हाला मुळीच सोडणार नाही' ' अरे इथे धोका आहे, आपल्याला जसा आदेश असेल तसेच आपण करायचे आपण काही घाबरून पळून जात नाही आहोत ' मी समजावयाचा प्रयत्न केला.'नाही, तुम्ही मोठ्या सरांना सांगा, आपण आमच्या गल्लीत शाखा घेऊ या ' हा तोडगा मला पटला आणि मोठ्या सरांना देखील गोपीच्या आनंदाला पारावर उरला न्हवता पण माझ्या मात्र छातीत धस्स झाले होते कारण त्यांच्या भागात मोकळी जागा म्हणजे सकाळी मुलांना संडासला बसवायचे ठिकाण होते!
ज्या दिवशी शाखा भरणार त्या संध्याकाळी मी तिथे जावून पोचलो आणि बघतो तर काय ३\४ मुलांना घेवून त्याने सगळा हगुर्दा साफ केला होता आणि १\२ मुले पाणी मारण्याच्या तयारीत होती!
तिथे चालू झालेली शाखा फार जोरात चालली हे वेगळे सांगायलाच नको. पुढे अनेक दिवस माझ्याआधी येवून तो सफाई करत असे.
पुढे जवळ जवळ २० वर्षांनी तो भेटला ३२ एक वर्षाचा गोपी अजूनही अविवाहितच होता.'काय करतो हल्ली ? ' मी विचारले ' गणपती मंडळांचे हलते देखावे मी करतो' तो म्हणाला आणि विशेष म्हणजे गोपी तांदुळावर गणपती काढण्याच्या कलेत वाकबगार आहे! त्याच्यासारखा संवेदनशील मुलगाच हे करू शकणार त्यामुळे यात मला मुळीच आश्चर्य वाटले नाही !
गेल्या ५\६ वर्षात मात्र तो अजिबात भेटला नाही.............. कुठे असेल तो? जिथे असेल तिथे आपली माणुसकी टिकवून असेल एवढे नक्की.देवा त्याला असेल तिथे सुखी ठेव एवढीच प्रार्थना !

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Dr Prasad phatak treats Nagin ya herpes by Ayurveda very fast

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.